Hindu Succession Act : आजकाल मुली अविवाहित राहणे पसंत करत आहेत. मनासारखं काम, कोणाचंही बंधन नको, अशी त्यांची भावाना आहे. पण, जेव्हा अशा अविवाहित मुलीचे निधन होते. आणि तिने कोणतेही मृत्युपत्र केलेले नसते, तेव्हा तिच्या स्व-अर्जित किंवा वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेचे कायदेशीर वारसदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. हिंदू वारसा हक्क कायदा, १९५६ या परिस्थितीत मालमत्तेचे वितरण कसे होईल, याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन करतो.
मृत्युपत्र केलेले नसल्यास
जर अविवाहित मुलीने तिच्या मालमत्तेबाबत कोणतेही मृत्युपत्र तयार केले नसेल, तर तिची संपत्ती हिंदू वारसा हक्क कायदा, १९५६ च्या कलम १५ (१) आणि १५ (२) नुसार वितरित केली जाते. अविवाहित हिंदू स्त्रीच्या मालमत्तेची विभागणी 'मालमत्तेचा स्रोत' यानुसार केली जाते.
२. वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता
- जर अविवाहित मुलीला तिची मालमत्ता तिच्या वडिलांकडून, आईकडून किंवा कुटुंबाकडून वारसा हक्काने मिळाली असेल, तर तिच्या निधनानंतर ती मालमत्ता खालील क्रमाने दिली जाते.
- प्रथम वारसदार: संपत्ती परत तिच्या वडिलांच्या वारसदारांना जाते.
- यामध्ये तिचे आई-वडील हयात नसले तरी, वडिलांच्या कुटुंबातील सदस्य (उदा. तिचे भाऊ, बहिणी किंवा त्यांचे वंशज) यांचा समावेश होतो.
- उदाहरण : अविवाहित मुलीला तिच्या वडिलांकडून घर वारसा हक्काने मिळाले. तिच्या मृत्यूनंतर, ते घर तिच्या भावांना किंवा बहिणींना मिळेल.
३. आईकडून वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता
- जर अविवाहित मुलीला तिची मालमत्ता तिच्या आईकडून भेट म्हणून किंवा वारसा हक्काने मिळाली असेल, तर तिच्या निधनानंतर ती मालमत्ता खालील क्रमाने दिली जाते.
- प्रथम वारसदार: संपत्ती परत तिच्या आईच्या वारसदारांना जाते.
- यामध्ये आईच्या कुटुंबातील सदस्य (उदा. आईचे भाऊ-बहीण किंवा त्यांचे वंशज) यांचा समावेश होतो.
४. स्व-अर्जित मालमत्ता किंवा इतर स्रोतांतून मिळालेली संपत्ती
जर अविवाहित मुलीने स्वतःच्या कमाईतून (उदा. पगारातून खरेदी केलेले घर, बँक बॅलन्स, एसआयपी/एफडी) मालमत्ता मिळवली असेल, किंवा तिला ती मालमत्ता तिच्या काका, आत्या, मामा, किंवा भेटवस्तू म्हणून मिळाली असेल, तर तिचे वारसदार खालील क्रमाने ठरवले जातात.
अधिकार क्रम
- प्रथम : तिचे आई आणि वडील. (दोघे हयात असल्यास दोघांना समान हिस्सा मिळतो.)
- दुसरा : वडिलांचे वारसदार. (म्हणजे तिचे भाऊ, बहिणी, पुतण्या, भाचे इत्यादी).
- तिसरा : आईचे वारसदार.
कायदेशीर सल्ला का महत्त्वाचा?
या कायद्यातील तरतुदी गुंतागुंतीच्या आहेत आणि मालमत्तेच्या मूळ स्रोतानुसार वारसदार बदलतात. अविवाहित मुलीने मृत्युपत्र तयार केल्यास, ती तिच्या इच्छेनुसार कोणालाही (उदा. आई-वडील, भाऊ-बहीण, किंवा कोणताही जवळचा नातेवाईक) मालमत्ता देऊ शकते आणि कायदेशीर गुंतागुंत टाळू शकते. जर मृत्युपत्र नसेल, तर मालमत्तेचा योग्य वारसदार निश्चित करण्यासाठी आणि मालमत्तेचे योग्य वाटप करण्यासाठी कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
वाचा - रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
टीप : ही माहिती हिंदू वारसा हक्क कायदा, १९५६ नुसार आहे. इतर धर्माच्या बाबतीत (उदा. ख्रिश्चन, पारसी) वारसा हक्काचे नियम वेगळे असू शकतात.
